शोध बॉक्स

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११

क्रिकेट आणि देश : आयर्लंड





आयर्लंड


सध्या विश्वचषकाच्या स्पर्धेत उतरलेल्या नवख्या संघांमध्ये सर्वाधिक गुणवत्ता असलेला संघ म्हणून आयर्लंडचा उल्लेख करावा लागेल. झिंबाब्वे आणि केनियासारख्या त्यामानाने जुन्या संघांना मागे सारुन ODI Ranking मधे दहावा क्रमांक पटकावणे आणि तो राखणे हे अर्धव्यावसायीक संघासाठी काही सोपे काम नव्हते, पण आयर्लंडने ते करुन दाखवले. हा संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यामानाने नवखा असला तरी अनोळखी नक्कीच नाही. इथे मैदानावर नुसते आयर्लंड म्हणालात तरी काही देश नकळत आपली कधीतरी सुजवली गेलेली तोंडे लपविताना दिसतील. म्हणूनच आयर्लंडला Giant Killer सुद्धा म्हणतात.



इतिहास :
क्रिकेट हा खेळ आयर्लंडला तसा नवा नाही. १८३० च्या दरम्यान आयर्लंडमध्ये पहिला क्रिकेट क्लब अस्तित्वात आला. आणि १८५० ला तर आयर्लंड देशाचा संघ पहिल्यांदा मैदावर सुद्धा उतरला! पण पुढे १८८० नंतर झालेल्या बर्‍याच राजकीय घडामोडींनी क्रिकेटच्या भविष्यावर परिणाम केला. या काळात राष्ट्रीयीकरणाच्या नादात अनेक परकीय (मुख्यत्वे इंग्रजी) खेळांवर बंदी घालण्यात आली (जी जवळपास १९७० पर्यंत लागू होती!). स्थानिक खेळाच्या संघटनांनी उचल खाल्ली आणि गॅलिक गेम्स (गॅलिक फूटबॉल आणि हर्लिंग) खूप यशस्वी झाले. त्यातच दक्षिण आयर्लंडने (सध्याचे रिपब्लिक ऑफ आयर्लंड) वेगळे होण्याचे ठरविल्याने परीस्थीती आणखी बिकट झाली. तरीही क्रिकेटप्रेमींनी क्रिकेट जगविण्याचे प्रयत्न चालू ठेवले. या संघाने अमेरीका, इंग्लंड, स्कॉटलंडचे दौरे केले तर इंग्लंड, स्कॉटलंडसारख्या युरोपीयन संघांनीही आयर्लंडचे दौरे केले. हे सर्व सामने प्रथम श्रेणी सामने ठरले.
हळूहळू या प्रयत्नांना यश येऊ लागले. आयर्लंडचा संघ इंग्लंडचे दौरे करु लागला आणि काऊंटी संघांबरोबर खेळू लागला, यामुळे संघाचा खेळ सुधारु लागला. (१९६९ मध्ये एका सामन्यात आयर्लंडने वेस्ट इंडीजला केवळ २५ धावात गुंडाळले होते!)
१९८० मध्ये आयर्लंड एकदिवसीय सामने खेळू लागला आणि मग त्यांच्या क्रिकेटला एक नवी दिशाच मिळाली. सध्याचा आयर्लंडचा संघ उत्तर आयर्लंड आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंड या दोन्ही देशांचे प्रतिनिधित्व करतो. आज हा संघ संपूर्ण सदस्यत्व नसलेल्या संघांमध्ये सर्वोत्कृष्ट संघ मानला जातो. २००६ मध्ये आयर्लंडला आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची मान्यता मिळाली. २००७ च्या विश्वचषकासही ते पात्र ठरले.

विश्वचषकात आजवर :
आयर्लंड पहिला विश्वचषक २००७ मध्ये खेळले, आणि सलामीच्या विश्वचषकामधेच अनेकांना आपला इंगा दाखवला. सराव सामन्यांमधेच त्यांनी पुढे काय होणार याची चुणूक दाखवली होती. आयर्लंड ला दक्षिण आफ्रिका केवळ ३४ धावांनी हरवू शकली तर कॅनडाला नीट उभे रहायला सुद्धा संधी मिळाली नाही, आयर्लंडने त्यांना ७ गडी राखून हरविले.
गटसाखळीतील पहिल्याच सामन्यात आयर्लंडला रोखता रोखता झिंबाब्वेच्या तोंडाला फेस आला. आणि मग पाकीस्तानच्या क्रिकेट इतिहासात तो काळा दिवस उजाडला, आयर्लंडने त्यांना, जागतिक क्रमवारीतील क्रमांक ४ च्या संघाला ३ गडी राखून हरवित पुढची फेरी गाठली! पुढे सुपर ६ मध्ये टीकणे त्यांच्यासाठी तसेही जवळपास अशक्य काम होते. पण तिथेही त्यांनी बांग्लादेशला लोळवत, तब्बल ७४ धावांनी विजय संपादन केला.

खेळ आणि खेळाडू - आज :
काही वर्षांपुर्वी आयर्लंडला खेळाडू गमाविण्याच्या भीतीने ग्रासले होते. यापुर्वीही संघाने त्यांचे खेळाडू इंग्लंडच्या संघाकडून खेळताना पाहीले आहेत. ओवेन मॉर्गन, एड जॉयस हेही असेच काही खेळाडू. पण आयर्लंडने अंमलात आणलेल्या काही नव्या संकल्पनांमुळे हे प्रकार कमी होत आहेत. एडमंड जॉयसला परत आणण्यातही ते यशस्वी झालेत. आयर्लंड आपल्या खेळाडूंना काऊंटी खेळण्यास मात्र नियमीत पाठविते. यामुळे त्यांच्या संघाची क्षमता फार वाढली आहे. त्या जोरावरच तर त्यांनी सहयोगी संघांच्या स्पर्धांमधे आपला दबदबा निर्माण केला आहे. इंटरकाँटीनेंटल कप ५ पैकी ३ वेळा तर युरोपीयन कप ८ पैकी ३ वेळा घेऊन त्यांनी आपले वजन दाखवून दीले आहे. याचाच परीणाम म्हणून २००९ च्य सहयोगी देशांमधून निवडण्यात येणार्‍या सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराच्या नामांकनामध्ये १४ पैकी ७ खेळाडू आयर्लंडचे होते, आणि विजेताही (विल्यम पोर्टरफिल्ड).
या संघातील काही खेळाडू नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत.
विल्यम पोर्टरफिल: संघाचा सध्याचा कप्तान व सलामीचा फलंदाज असलेला हा खेळाडू आयर्लंडसाठी काही अत्यंत महत्वाच्या खेळी खेळलेला आहे. ICCच्या २००९ च्या सहयोगी देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कारही याने मिळवीला आहे.
जॉर्ज डॉकरेल : या डावखुर्‍या फिरकी गोलंदाजास त्याच्या १९ वर्षाखालील संघातील उत्तम प्रदर्शनामुळे वरीष्ठ संघात स्थान मिळाले आहे. आणि येथेही त्याची कामगीरी बहरत चालली आहे.
ट्रेंट जॉनसन : ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत स्पर्धेत न्यू साऊथ वेल्स तर्फे खेळणारा हा आयरीश खेळाडू आयर्लंडच्या वेगवान गोलंदाजीचा आधारस्तंभ आहे.
अँड्र्यू व्हाईट : थोडे फार युसूफ पठाण सारखे profile आहे या खेळाडूचे. ६-७ व्या क्रमांकावर येऊन तडाखेबंद फलंदाजी करणे आणि कठीण वेळेस फिरकीने एखादी विकेट उडवणे याचे काम आणि हे आजवर अँड्र्यूने बर्‍यापैकी जमवले आहे.

विश्वचषक २०११ :
या विश्वचषकासाठी झालेल्या पात्रता स्पर्धेतही आयर्लंडने विजेतेपद प्राप्त केले आणि विश्वचषकास पात्र ठरले. आयर्लंडने या स्पर्धेसाठी शक्य तितकी जास्त तयारी केली आहे. यावेळेस त्यांच्याकडे जवळपास सर्व खेळाडू हे पुर्णवेळ क्रिकेट खेळणारे आहेत. आयर्लंडने पुर्ण सदस्यत्वासाठी अर्ज केलेला असल्याने त्यांना या स्पर्धेत बर्‍यापैकी खेळावेच लागेल. आयर्लंडचा संघही नुकताच घोषित करण्यात आलाय. तो असा :
१. एडमंड जॉयस डावखुरा फलंदाज (गरज पडल्यास मध्यमगती गोलंदाजी - उजव्या हाताने)
२. विल्यम पोर्टरफिल्ड डावखुरा फलंदाज (संघाचा कप्तान)
३. पॉल स्टर्लिंग फलंदाज (गरज पडल्यास फिरकी गोलंदाजी)
४. आंद्रे बोथा डावखुरा फलंदाज (गरज पडल्यास मध्यमगती गोलंदाजी - उजव्या हाताने)
५. अ‍ॅलेक्स कोसॅक अष्टपैलू (फलंदाज व मध्यमगती गोलंदाज)
६. ट्रेंट जॉनसन अष्टपैलू (फलंदाज व मध्यमगती गोलंदाज)
७. नायजेल जोन्स अष्टपैलू (फलंदाज व मध्यमगती गोलंदाज)
८. जॉन मूनी डावखुरा फलंदाज (मध्यमगती गोलंदाजी - उजव्या हाताने)
९. केविन ओ'ब्रायन अष्टपैलू (फलंदाज व मध्यमगती गोलंदाज)
१०. अँड्र्यू व्हाईट अष्टपैलू (फलंदाज व फिरकी गोलंदाज)
११. नील ओ'ब्रायन यष्टीरक्षक (डावखुरा फलंदाज)
१२. गॅरी विल्सन यष्टीरक्षक
१३. जॉर्ज डॉकरेल डावखुरा फिरकी गोलंदाज
१४. बॉयड रँकीन मध्यमगती गोलंदाज
१५. अल्बर्ट वॅन डर मर्व्ह फिरकी गोलंदाज

क्रिकेट मध्ये नाव कमविण्याच्या या संघाच्या प्रयत्नांना काही अंशी तरी यश येवो ही शुभेच्छा. पुढील वेळेस अजुन एखाद्या अशाच संघाबाबत बोलू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा