शोध बॉक्स

गुरुवार, १६ जून, २०११

अय स्साला... कोई शक?

उगाचच (वजन थोडं जास्त असलं तरी) मादक दिसू पहाणारी एक मुलगी रस्त्याने चालली आहे. मधेच रस्त्यात काही गुंड तिला आडवे येतात आणि त्रास देऊ लागतात. कोणीतरी तिची एक बाही फाडतो तेवढ्यात... अचानक कुठून तरी एक बाटली घरंगळत येताना दीसते (कींवा त्रास देण्यात जरा ढ असल्यामुळे मागे राहीलेल्या एका गुंडाच्या गालावर जोरदार ठोसा बसतो). सगळे त्या दिशेने बघतात. कोणी तरी विचारतो, "कौन हे बे तू?". पलीकडे तो उभा असतो...

मैं हू तुम जैसों से नफ़रत करने वाला ...
गरीबों के लिए ज्योती, गुंडो के लिए ज्वाला ,
तुझे बनाके मौत का निवाला ,
तेरे सिने में गाड दूंगा मौत का भाला .


पिटात सगळी कडे शिट्ट्या आणि टाळ्या... पुढची सगळी मारामारी नुसता गोंगाट, कुणी शर्ट फिरवतंय कुणी टोप्या उडवतंय तर कुणी चक्क नाणी पडद्यावर फेकतंय! चित्रपटाचं नाव काहीही असो जवळपास हाच सीन आणि असाच प्रतिसाद. कारण? फक्त एकच... कोई शक?

सामान्य लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या सुपरहीरोचा आज वाढदिवस...

बी-ग्रेड किंग म्हणून बॉलिवूडने एकेकाळी झिडकारलेल्या या अभिनेत्याचं सारं काही वेगळंच. बॉलिवूडच्या झगमगाटात त्याला अभिनय दाखवण्याची संधी फारशी मिळालीच नाही. लॉबींग आणि लोकप्रियतेच्या अनुसार वाटल्या जाणार्‍या फिल्मफेअर नाहीतर स्टारडस्टसारख्या पुरस्कारांनी कुठे तरी सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिका कींवा सहाय्यक कलाकाराचे पुरस्कार दिले त्याला, पण त्याच्या अभिनय क्षमतेला न्याय देणार्‍या भूमिका मात्र त्या पुरस्कारांइतक्याच कमी दिल्या.





तरीही या पठ्याने एक दोन नव्हे तर तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला.

ऐंशीच्या दशकात डीस्को डान्सर म्हणत नाचत भारतापासून ते रशिया चीन पर्यंत लोकांवर गारुड करणार्‍या नायकाला नंतर फारसे चांगले काम मिळेनासे झाले आणि त्याने मेनस्ट्रीम सिनेमाला राम राम ठोकला. आजही रशिया कींवा चीन सारख्या देशात त्याचे "आय एम अ डीस्को डान्सर" कींवा "जिमी जिमी आजा आजा" कुठेतरी जिवंत असेल.

पण मग हॉटेलींगच्या दुनियेत शिरताना त्याने एक वेगळाच प्रयोग केला... फॅक्टरी काढली, हो... चक्क फॅक्टरीच काढली सिनेमांची. या ड्रीम फॅक्टरी मधून मग धडाधड सिनेमे बाहेर पडायला लागले. हीरो हाच, बाकी अभिनेते असेच कुणीतरी... स्ट्रगल करणारे स्वस्तातले. अभिनेत्री ही बर्‍या दीसणार्‍या पण अपीलींग आणि स्वस्त... कथा अशाच स्वत:च्या हॉटेलमधे बसून पाडलेल्या... लोकेशन्स आजूबाजूला जी मिळतील ती आणि टीमची रहाण्या खाण्याची सोय ह्याच्याच हॉटेल मधे! ही कॉस्ट कटींगची हाईट होती... जेव्हा बॉलीवूडमधे सिंगल शेड्युल शूटींग म्हणजे काय हे माहित नव्हतं तेव्हा हे लोक २० एक दिवसात सगळं शूटींग उरकत होते. डबिंग, जमलं तर एडीटींग करुन ३० दिवसात सिनेमा बाजारात सुद्धा!!! बरं प्रकरण इथेच थांबायचं नाही तर लगेच पुढच्या चित्रपटाचं काम सुरु! जेव्हा हे सगळं जोमात चालू होतं तेव्हा त्या ड्रीम फॅक्टरीतून १० वर्षात १००+ चित्रपट बाहेर पडले होते! आणि हा २००+ चित्रपटांचा नायक बनला होता...

बरं हे चित्रपट काही पडेल वगैरे पण नव्हते... ते चालायचे! जबरदस्त चालायचे, इतके की त्या १० वर्षातली ५-६ वर्ष हा नायक भारतातला सर्वाधिक कर भरणारा माणूस बनला! हे चित्रपट पांढरपेशा, स्वतःला सुशिक्षीत म्हणवून घेणार्‍या सोसायटीला आवडायचे नाहीत, फालतू वाटायचे. हरकत नाही... ते नव्हतेच त्यांच्यासाठी. हा माणूस चित्रपट बनवत होता अशा लोकांसाठी जे आयुष्य विसरायला येतात. दिवसभरात मरुन मरुन कमावलेल्या दमड्यांमधुन थोडे वाचवून आत येतात ते बच्चनच्या एंपायरला झिडकारून फॉरीनला जाणार्‍या शारुख ला बघायला? बॉलिवूडवाल्या फ्यामिलीतल्या लोकांच्या अश्रूंच्या पूराबरोबर रडायला? का हिरोईनीमागे झाडांभोवती गिरक्या मारत गाणी म्हणताना बघायला? त्यांना हवा असतो एक हीरो, बर्‍यापैकी त्यांच्या सारखाच... वाईट अवस्थेत अडकलेला, दुनियेनं झिडकारलेला आणि मग त्यांना हवं असतं त्यानं त्या दुनियेला मरेस्तोवर मारणं. ते लोक त्याला ते सगळं करताना बघायला येतात जे त्यांना नाही करता येत. मग कथा अभिनय लोकेशन्स वगैरे सगळं झूठ असतं. तो... पडद्यावरचा तो फक्त सत्य असतो आणि त्याने मारलेला प्रत्येक ठोसा पिटातल्या प्रत्येक प्रेक्षकाने मारलेला असतो, त्याचा प्रत्येक डायलॉग मग तो कीतीही निरर्थक असो... त्यांचा असतो. हे साधं गणित त्याला कळलं होतं. मग त्याच्या मध्यमवर्गिय चाहत्यांना कीतीही वाईट वाटंलं असलं तरी त्याने दशकभर हाच मार्ग निवडण्याचं ठरवलं, काही वर्ष जत्रेतल्या, फिरत्या थेटरातल्या, उघड्यावर जमेल तिथं बसून रुपया दोन रुपया खर्चून पिक्चर पहाणार्‍या खर्‍या सामान्य माणसाला खूश करायचं ठरवलं. ठीकच आहे म्हणा, आमच्याकडे बाकी लोक होतेच की बॉलिवूड मधे... तेवढाच कींवा जवळपास जाणारा अभिनय करणारे.

मग कधीतरी तो परत आला, झगमगाटी दुनियेत. उगाच शेड्स लावून आणि वेगवेगळे हेअरकट करुन फिरत स्वतःला हिरो म्हणवणार्‍या पोरांना त्यानं अभिनय करुन दाखवला. असं करु शकणारे चांगले जाणते अभिनेते इथे आधीपासून नव्हते असं नाही. पण त्याने ते परत आणि पुन्हा पुन्हा करुन दाखवलं. तो एक अभिनेता आहे आणि तुम्ही त्याला नीट वापरला नाही हे जणू त्याला दाखवायचं होतं.

भले त्याच्या त्या बी-ग्रेड चित्रपटात उटपटांग स्टोरी असो, फालतू चूका असोत की कोन बदलून वापरलेली तीच ती लोकेशन्स असोत, त्याने त्याच्या एकट्याच्या जीवावर प्रत्येक चित्रपट तोलला. भले ते डायलॉग्ज कीतीही फालतू आणि निरर्थक असोत त्याने ते आपल्या स्टाईलनं म्हणत हिट केले. त्या डायलॉग्जनी आणि ते डिलीव्हर करण्याच्या स्टाईलनी तुमच्या चेहेर्‍यावर एक स्मितरेषा येत नसेल कींवा तुमच्या चेहेर्‍याचे भाव बदलत नसतील तर तुम्हाला चेक अपची गरज आहे!.

आपल्या वेगळ्या स्टाईलने त्याने जवळपास प्रत्येकाच्या मनात जागा मिळवली... कुणाकडे सुपरहीरो, देव म्हणून, कुणाकडे उत्तम अभिनेता म्हणून, कुणाकडे डीस्को डान्सर म्हणून, कुणाकडे विनोदाचा एक भाग म्हणून तर कुणाकडे केवळ कुतूहल म्हणून... पण त्याला कुणी दुर्लक्षू मात्र शकलं नाही.

आजही आम्ही (त्याचे डाय हार्ड फॅन वगैरे नसलो आणि ते फिरत्या थेटरात लागणारे बरेचसे सिनेमे बघितले नसले तरी) मुलं जेव्हा बॉलिवूडचे भारी डायलॉग मारायला सुरु करतो तेव्हा मोगँबो, शाकाल, गब्ब्रर, जय विरु यांच्यावरुन गाडी अय स्साला करत याच्याच डायलॉग्जवर कशी येते आणि मग तिथेच कशी फिरत रहाते हे सांगायला कुण्या चित्रपट समिक्षकाची गरज नाही... कोई शक?

1 टिप्पणी:

  1. जियो यार....
    मस्तच लिहीले आहेस. वेळ मिळाल्यास इथे पण चक्कर मार. हा वेडा पण तुझ्या-माझ्यासारखाच मिथुनदाचा भक्त आहे. इतका की त्याने आपल्या ब्लॉगचे नावच ’बाबाची भिंत’ ठेवलेय.
    http://www.thebabaprophet.blogspot.com/

    उत्तर द्याहटवा