शोध बॉक्स

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

स्वप्नी माझ्या येशील... का?

स्वप्नं... जवळपास सर्वांचीच काही ना काही स्वप्नं असतात.  पण ती जागेपणी, हो जागेपणीच.  कारण बर्‍याच लोकांना ते जागेपणी ज्या गोष्टीला ’अमुक एक बनणं माझं स्वप्न आहे’ कींवा ’ही माझी स्वप्नसुंदरी आहे’ असं म्हणतात ती त्यांच्या स्वप्नात मात्र शक्यतो येत नाही! :)

तुम्हाला ही काही इंटरेस्टींग स्वप्ने पडली असतीलच की... म्हणजे  कधी एखादं भीतीदायक स्वप्न, कींवा कधी आपण जे करायचं नाही असं ठरवलंय तेच स्वप्नात करताना दिसणं.  एक स्वप्न तर बहूतेक सर्वजण किमान एकदा तरी अनुभवतातच, आपला स्वप्नात अचानक तोल जातो आणि आपण जागे होतो कींवा स्वप्नात कुणीतरी पोटाला गुदगुल्या केल्यात आणि तुम्हाला जाग आली?

मधे येऊन गेलेल्या इन्सेप्शन चित्रपटाने सुद्धा स्वप्न हा विषय हाताळला होता, आणि त्यात वापरली गेलेली बरीच माहिती बरोबर सुद्धा होती!  या चित्रपटाने स्वप्नांबाबतचे माझे काही जुने अनुभव जागे केले होते.


तेव्हा मी नुकताच कॉलेजला जाऊ लागलो होतो आणि त्या दरम्यानच मित्रांशी बोलताना लक्षात आलं की इतरांना त्यांनी रात्री पाहीलेलं स्वप्नं कधीकधी लक्षात रहातं पण आपल्याला मात्र कधीकधी २-३ स्वप्नं सुद्धा आठवतात!  सुरुवातीला गंमत वाटली आणि मी रोज ती आठवण्याचा प्रयत्न करु लागलो.  कधी कधी जमायचं सुद्धा.  मग मला अचानक १-२ वेळा जाणवलं की मी स्वत: स्वप्नात जागा आहे आणि अधे मधे मी स्वप्नाची दिशाही बदलतोय!  आता मला हे सगळं गूढ वाटू लागलं होतं काही तरी भारी शक्ती वगैरे. :) म्हणून मग मी प्रयत्न वाढवले.  पण मग एकदा भयानक घटना घडली.  मला जाणवलं की मी पालथा आहे, माझ्या पाठीवर बसून कोणीतरी भेसूर हसतंय. सगळीकडे काळोख होता.  मला काहीच करता येत नव्हतं, जखडला गेलो होतो मी.  घाबरुन ओरडण्याचा प्रयत्न केला तर आवाजही फ़ुटेना.  काहीच सुचत नव्हतं. शेवटी विचार करणं सोडून दिलं... काय झालं माहिती नाही पण पहाट झालेली होती आणि मी झोपेतून ऊठत होतो.  त्यादिवशी मनाशी गाठ बांधली की असली मस्ती परत करायची नाही. :)

पण ४ एक वर्ष उलटून सुद्धा स्वप्नात जाणिवा असणं प्रयत्न न करता ही होत होतं, म्हणजे मला मी स्वप्नात आहे हे कळायचं.  पण मी त्यांच्याशी उगाच खेळ करणं बंद केलं होतं.  तरीही परत एकदा विचित्र घटना घडलीच.  मला माझे शरीर हलवता येत नव्हते.  इकडे तिकडे बघितलं तर खाली मला मीच दिसलो! खूप घाबरल्या सारखं झालं ओरडायचा प्रयत्नही केला... (घ्या... आता बॉडी खाली आहे तर तोंड तिकडे खालीच असणार ना, ओरडणार कुठून? :) पण स्वप्नांच्या डायरेक्टर ला असले प्रश्न पडत नाहीत.) पण काही नाही.  मग सकाळी पुन्हा नॉर्मल.  शेवटी याचा अर्थ लावायचाच असं ठरवलं, इंटरनेट वर शोध घेतला आणि माहिती काढली.  आणि ती वाचून मजा वाटली!  आपल्या स्वप्न पहाण्यात इतक्या गोष्टी असतात हा विचारच नव्हता केला ना कधी...  त्यानंतर मात्र सांगितलेल्या गोष्टींची काळजी घेतल्यामुळे म्हणा कींवा हा काय प्रकार आहे हे कळल्यामुळे म्हणा, असे विचित्र अनुभव आले नाहीत आणि दु:स्वप्नांची भीतीही वाटत नाही.

तर सामान्यपणे...
प्रत्येक माणूस आयूष्यात काही स्वप्ने आठवतोच.
प्रत्येक माणसाला दु:स्वप्ने पडतातच.
निम्याहून अधिक माणसे स्वप्नांमधे जागे राहू शकतात.
जवळपास ४०% लोकांना Sleep Paralysis चा अनुभव आयूष्यात किमान एकदातरी येऊ शकतो.
झोपेची वेळ, कालावधी, मानसिक संतुलन आणि झोपेतून उठतानाची मेंदूची अवस्था यावर स्वप्ने पडणे कींवा स्वप्नांशी संबंधीत विचित्र घटना कींवा झोपेतील आजार अवलंबून असतात.

स्वप्ने ही बर्‍याचदा आपण एखादी गूढ गोष्ट समजतो, कधी त्यांच्यामधले बदल न टिपता दुर्लक्ष करतो तर कित्येकदा त्यांना घाबरतोही.  पण स्वप्नेसुद्धा कधीतरी आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतील तर? की खरंच स्वप्ने ही आपल्या अचेतन मेंदूचे आपल्या हातात नसलेले खेळ असतात? झोपेवर आजवर बरेच संशोधन झाले आहे आणि त्यातून झोपेबद्दल बरीचशी माहिती समोर आली आहे.  आजही यावर संशोधन चालूच आहे.  आता स्वप्ने ही झोपेत पाहीली जात असल्या मुळे स्वप्न पडणे म्हणजे काय आणि झोपेत काय काय घडते ज्यामुळे स्वप्न पहाणे शक्य होते ते पहाणे गरजेचे आहे.

झोपेच्या दोन अवस्था मानल्या गेल्या आहेत.  एक Rapid Eye Movement (REM) अवस्था ज्यात डोळ्यांची हालचाल वेगाने होत असते, याच अवस्थेमधे आपण स्वप्ने (हो... ही नेहमी एकापेक्षा जास्त असतात) पहातो, आणि यातल्या काही गोष्टी लक्षात राहू शकतात.  आणि दुसरी Non-Rapid Eye Movement (NEM) ज्याला गाढ झोप म्हणता येईल.  या अवस्थेमधल्या गोष्टी आपल्या लक्षात रहात नाहीत. गाढ झोपेच्या ३ ते ४ पायर्‍या असतात आणि एकूण कीती वेळ झोपलो आहे यावर आपण कुठल्या पायरीवर आहोत हे ठरतं.  म्हणूनच तर काही वेळेस अत्यंत कमी वेळ झोपूनही आपल्याला तरतरी आल्यासारखं वाटू शकतं (कारण झोपेच्या पायर्‍या नीट पाळल्या जाऊनच आपण जागे झालो.) तर कधी फ़ार कंटाळवाणं वाटू शकतं (इथे सर्व पायर्‍या नीट न पाळता मधेच जाग आली).

मुळात, शांत व चांगली झोप मिळण्यासाठी ती फ़क्त योग्य वेळी घेणंच गरजेचं नाही तर योग्य तितका वेळ घेणंही गरजेचं आहे, कारण यामुळे झोपेच्या सगळ्या पायर्‍या नीट पाळल्या जाण्याची शक्यता वाढते.  हा ग्राफ़ पहा म्हणजे तुम्हाला झोपेचा एकंदर पॅटर्न लक्षात येईल.
आपण जागे झाल्यावर जे स्वप्न आपल्याला आठवत असते ते शक्यतो शेवटच्या REM मधले असते.  बरं ही स्वप्ने पहाणे पण सोपी गोष्ट नाही.  यासाठी आपल्याला एका प्रक्रीयेतून जावे लागते आणि ती नीट न झाल्यासही घोळ होऊ शकतात.  तर जेव्हा जेव्हा आपण REM मधे जात असतो तेव्हा आपला मेंदू आपल्या शरीरावरचे नियंत्रण काही काळासाठी सोडतो, याचा फ़ायदा म्हणजे तुम्ही एखादे थ्रिलर किंवा हाणामारीवाले स्वप्न पहात असाल तरी इतरांना (आणि स्वत:लाही) जखमी करणार नाही. :)  आता मेंदूतील शरीराला नियंत्रित करणारे सर्व भाग आराम करत असतात, पण गमतीशीरपणे चेतन मेंदूतला एक भाग काम करीत रहातो आणि मग स्वप्ने आठवण्यास कारणीभूतही ठरतो.

आता हे सगळं झाल्यावर आपण REM मधे आलो (इथून पुढे आपण म्हणजे चेतन मेंदूतला एक भाग समजा).  इथे आपला अचेतन (subconscious) मेंदू काम करु लागतो, हा आपल्या स्वप्नांचा दिग्दर्शक, आणि खरं तर पटकथालेखक सुद्धा.  घोळ इतकाच असतो की याला विषयच दिलेला नसतो!  कारण स्मृतींमधे आज कुठे काय भरलंय आणि कशाची उजळणी केली आहे ही माहिती असलेले भाग तर आराम करताहेत.  मग हा स्वत:च  स्मृतींमधून मिळेल तशी माहिती जमवायला सुरु करतो आणि जागेवरच पात्रे, कथा, स्थळं वगैरे उभी करु लागतो (विश्वास ठेवा... मला एकदा मी जुरासिक पार्कमधे अडकलोय आणि सनी देऒल मला डायनासोर पासुन वाचवतोय असंही स्वप्न पडलं होतं!!! हे त्या स्पिलबर्गच्या बापाला तरी सुचलं असतं का? :D ).  यामुळे आपण आज विचार केलेल्या गोष्टी स्वप्ना मधे येतीलच कींवा येणारच नाहीत अशी कुठलीही हमी देता येत नाही.

शक्यतो आपल्याला जाग आल्यावर लगेचच स्वप्नांच्या स्मृती धूसर व्हायला सुरुवात होते (स्त्रीयांना स्वप्ने जास्त चांगली लक्षात रहातात म्हणे... त्यामुळे त्यांच्या स्वप्नात जाणार असाल तर जरा जपून ;) ).  पण जर पडलेल्या स्वप्नांमधे एखादे अत्यंत भीतीदायक कींवा खूप चांगले स्वप्न असेल तर ते लक्षात रहाते.  स्वप्नांबाबत एक मजेशीर गोष्ट म्हणजे ती तुटक असतात, म्हणजे एखादे स्वप्न मधेच चालू कींवा मधेच संपू शकते आणि पुढचे स्वप्न (जे पुन्हा पूर्णपणे असंबद्ध विषयावर असू शकेल) सूरु होवू शकते.  हे म्हणजे महाभारताच्या शॉटमधे सुपरमॅन येण्याइतके असंबद्ध असू शकते.  एक मात्र नक्की, स्वप्ने आठवणे हे शिकता येते.  झोपेतून उठल्या उठल्या स्वप्ने आठवण्याचा प्रयत्न नेहमी करत राहील्यास एकापेक्षा जास्त स्वप्ने आठवण्याची क्षमतासुद्धा प्राप्त करता येते.

मग जर स्वप्ने आठवू शकतात तर त्यात आपल्याला जाता येईल?  याचं उत्तर हो आहे!  काही लोकांना ही क्षमता असते व काही लोक सततच्या प्रयत्नांनी हे साध्य करतात.  याला Lucid Dreaming म्हटले जाते, अशा प्रकारच्या स्वप्नात तुम्हाला कळून चुकलेले असते की तुम्ही झोपेत आहात आणि तुम्ही पहाताय ते स्वप्न आहे.  त्यामुळे एका अर्थाने तुम्ही (चेतन मेंदूचा तो एक जागा असलेला भाग!) स्वप्नात राहून ते अनुभवत असता आणि ते लक्षातही रहाते.   याचा दु:स्वप्नांचा अंमल कमी करण्यासाठी फ़ार उपयोग होऊ शकतो.  कारण जर दु:स्वप्नांमधे आपल्याला हे मान्य करता आले की मी पहातोय ते एक स्वप्न आहे तर त्याचा परीणाम बराच कमी होऊ शकतो!

पण याचाच एक भाग म्हणून दुसरी गंमत मात्र घडू शकते... कधी असं वाटलंय की तुम्ही सकाळी ऊठून आवरताय, कामावर जायला उशीर होतोय म्हणून पळापळ करताय... आणि जागे झालात हे पहायला की तुम्ही आत्ता पहात होतात ते स्वप्न होतं?  :) असंही होऊ शकतं.  एखाद्या स्वप्नाच्या मधेच आपल्याला कळलं की हे स्वप्न आहे  आणि कदाचित ते तितकंसं भारी स्वप्न नसेल म्हणून आपण तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.  आता बाहेर म्हणजे काय तर आपल्यासाठी बाहेर येणं म्हणजे जाग येणं.  मग आपला अचेतन मेंदू नवी चाल खेळतो, तो आपण जागे झाल्याचंच स्वप्न रचतो आणि आपल्याकडूनच सकाळी आवरण्याची माहिती घेऊन False Awakening ची स्थिती तयार करतो!  आहे ना मजेशीर...

हे तर झालं गमतीशीर... पण या Lucid Dream मुळे संभ्रम कींवा भीतीने गाळण उडण्याची वेळही येऊ शकते.  वर दीलेली घटना शक्यतो तेव्हा घडते जेव्हा आपल्याला स्वप्नात असताना आपण स्वप्नात असल्याची जाणिव होते.  पण स्वप्नात जातानाच जर अशी जाणिव निर्माण झाली तर थोडेसे विचित्र परीणाम समोर येतात.  जर स्वप्नात जातानाच आपण स्वप्नात जात असल्याची जाणिव घेऊन जात असू तर स्वप्न पहाण्यासाठी केली जात असलेली ती सर्व प्रक्रीया आपण अनुभवत असतो! त्यामुळे आपल्याला भयानक आवाज येणे, शरीर थरथरत आहे कींवा सर्वांगाला मुंग्या येत आहेत असे वाटणे कींवा आपण आपल्या शरीरातून बाहेर पडलो आहोत असे वाटणे असे वेगवेगळे विचित्र अनुभव येऊ शकतात.  बरं आपण असतो मात्र झोपेत त्यामुळे पुढच्या प्रक्रीया घडत रहातात.  मात्र झोप झाल्यावरही हे अनुभव एक भयानक कींवा विचित्र स्वप्न म्हणून आपल्याबरोबर येतात.

याशिवाय अजून एक प्रकार म्हणजे आपल्या छातीवर कींवा पाठीवर कोणीतरी बसले आहे... आपले हातपाय जखडण्य़ात आलेत आणि इच्छा असूनही आपण मदती साठी हाका मारु शकत नाही, काही करु शकत नाही असे खूप भयानक स्वप्न पडणे. हे सुद्धा Lucid Dreaming आहे.  पण वर म्हटल्याप्रमाणेच इथेही भर स्वप्नात आपण जागे असतो,  आपल्याला शरीरावर नियंत्रण नाही हे समजते (Sleep Paralysis) आणि घाबरतो तेव्हा आपले जे काही विचार असतील ते स्वप्नात उमटतात आणि आपल्याला तसे भयानक पात्र छातीवर कींवा पाठीवर असल्याचे जाणवते.

यावर उपाय म्हणजे स्वप्नात बदल करणे! होय,  आता जर तुम्ही असेही स्वप्नात आहात आणि तुम्हाला हे माहिती आहे तर मग थोडे अजून प्रयत्न करुन स्वप्नातच बदल करा!  काही प्रयत्नांनंतर हे ही थोड्या फ़ार प्रमाणात जमू लागते.  (भयानक स्वप्ने पडताना अचानक देवाचा धावा करता तेव्हा तुम्ही तो खरंच जागे होऊन तुमच्या तोंडाने करता की स्वप्नात करता? :) )  यासाठी फ़क्त आपण स्वप्नात आहोत आणि ते बदलणे शक्य आहे हे मान्य करता यायला हवं.

एकदा का हे करता आलं तर मग तुम्ही आपल्या स्वप्नांच्या दिग्दर्शकाच्या हातातलं एक पात्र न रहाता त्याच्या बरोबरीने दिग्दर्शन करु लागता.  तुमचा रोल कमी महत्वाचा असेल तर वाढवू शकता,  एखादं पात्र बदलू शकता.  पण तुम्हाला पुर्ण स्वप्न मात्र बदलता येत नाही (स्वप्नांचा रोख ठरवता येऊ शकतो)  कारण तुमच्या मुख्य दिग्दर्शकाला असं काही केलेलं आवडत नाही. जास्त बदल केले की तो स्वप्नच बदलण्याची शक्यता वाढते. :)

वर एकदा म्हटल्याप्रमाणे कधी कधी आपण नक्की स्वप्नात आहोत की सत्यात असा गोंधळ होऊ शकतो तेव्हा काय करावे?  यावरही उपाय आहे.
तुम्ही जर आठवण्याचा प्रयत्न केलात तर लक्षात येईल की तुम्ही स्वप्नात स्वत:ला संपूर्ण कधीच पाहीलेले नाही.  म्हणूनच मग स्वप्नात आरसा आणण्याचा प्रयत्न करा, त्यात तुम्हाला जर तुमची स्वच्छ प्रतिमा दिसली नाही तर तुम्ही नक्कीच स्वप्नात आहात.
आजूबाजूला असलेली प्रकाशयोजना बदलण्याचा प्रयत्न करा (लाईटचे स्विच वर खाली करुन पहाणे वगैरे), ह्या गोष्टीत आपल्याला बदल करता आले नाहीत तर आपण स्वप्नात आहोत.
घड्याळात कीती वाजलेत ते पहा, दुसरीकडे पहा आणि पुन्हा कीती वाजलेत ते पहा.  साधे घड्याळ असेल तर शक्यतो वेळ आजिबात बदलत नाही कींवा खूपच बदलते. तर डिजीटल घड्याळ चित्रविचित्र वेळा दाखवू शकते.
दोन्ही हाताची बोटे एकावेळेस पाहून मोजण्याचा प्रयत्न करा.
(हा अजून एक प्रकार... शास्त्रिय पद्धतीने पडताळलेला नाही पण मला वाटतं यानेही मदत होईल... लग्न झालेलं असल्यास बायकोचा चेहरा पहाण्याचा प्रयत्न करा. :D )

स्वप्ने ही जागेपणी गमतीशीर वाटतात, मग भलेही ती पहाताना कीतीही आनंद, राग, भीती वाटलेली असो.  ती जगातली सर्वात जुनी मनोरंजन सेवा आहे हे विसरुन कसं चालेल?  त्यांना घाबरण्यापेक्षा त्यांची मजा लुटणेच जास्त योग्य वाटते मला.

मग... करताय तुमची स्वप्ने शेअर? ;)

३ टिप्पण्या:

 1. अमित ...! मस्त लिहीलेस रे... चांगली माहिती दिलीस...!

  " तुम्ही जर आठवण्याचा प्रयत्न केलात तर लक्षात येईल की तुम्ही स्वप्नात स्वत:ला संपूर्ण कधीच पाहीलेले नाही. म्हणूनच मग स्वप्नात आरसा आणण्याचा प्रयत्न करा, त्यात तुम्हाला जर तुमची स्वच्छ प्रतिमा दिसली नाही तर तुम्ही नक्कीच स्वप्नात आहात.>>>> +१
  त्यात अजून एक गोष्ट तू नोटीस केली असशील तर..... स्वप्नात कुणाचेच चेहरे स्पष्ट दिसत नाहीत.... पण आपल्याला बर्‍याचदा जाणीव असते की स्वप्नातील व्यक्ती कोण आहे .

  एक स्वप्न आठवले.... मला एकदा परीक्षा संपल्यावर स्वप्न पडले होते...... माझा पेपर आहे.आणि अगदी थोडा वेळ शिल्लक आहे..मी बसमध्ये बसलोय.... तो बस ड्रायव्हर नेमका अगदी आरामात बैलगाडी हाकतोय अशा स्पीडने चाललाय...... कळस म्हणजे.... सिटी बस ड्रायव्हर मध्येच बस थांबवून चहा प्यायला उतरला..... माझा जीव अगदी घायकुतीला आला होता...... :)शेवटी मी खूप उशीरा पोहोचलो.... तर मला सुपरवायझर पेपरच देईना.... !
  रिझल्टपर्यंत कितीतरी दिवस मला धडधडायचं .... त्या स्वप्नाचा अर्थ काय असेल...? याचा सारखा विचार डोक्यात यायचा...! :)

  बाकी एकदाचा वेळ काढून लिहीलेस .... म्हणून शुध्दलेखनाच्या चूका तुला माफ...! ;)

  उत्तर द्याहटवा
 2. धन्यवाद मित्रा... लेख रात्री ३ वाजेपर्यंत बसून लिहीत होतो रे... सकाळी कसातरी पूर्ण करुन छापलाय. :) एक झोप वाया घालवत, अर्धवट जागत केला पूर्ण शेवटी एकदाचा. पुढच्या वेळेस काळजी घेईन.

  उत्तर द्याहटवा
 3. please give more information about Lucid dreaming - how it can be used for personal development etc. for students and management trainees. Thanks for a great article. ...Jagdish Kulkarni, Nashik

  उत्तर द्याहटवा